नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अयोध्या रामजन्म भूमी ट्रस्टच्या नावाने लाखो राम भक्तांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या नावाने अशा बनावट-फेक वेबसाईट बनवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने वेबसाईट सुरू केली होती. ही वेबसाईट बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक स्वरुपात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपींनी बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आणि राम मंदिराच्या नावाखाली देणगीदारांकडून लाखो रुपये उकळले. त्यांनी भाविकांचा विश्वासघातच केलेला नाही, तर बनावट वेबसाईट बनवण्याचे बेकायदेशीर कृत्यही केलं आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटवण्यात आली आहे. आशिष गुप्ता (वय २१), नवीन कुमार सिंग (वय २६), सुमित कुमार (वय २२), अमित झा (वय २४) आणि सुरज गुप्ता (वय २२) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारीनंतर या प्रकरणाची माहिती नोएडातील सायबर क्राईम पोलिसांना देण्यात आली. तपासात नोएडामध्ये फेक वेबसाईट चालवली जात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे सहा बँक खात्याचे डिटेल्स मिळाले आहेत. दोन खात्यातून अडीच लाख रुपये मिळाले आहेत. पोलिसांनी बँक खात्यात झालेली लाखोंची रक्कम फ्रीज केली आहे. या टोळीचा प्रमुख सुत्रधार आशिष गुप्ता असून तो सॉफ्टवेअर बनवतो.
















