अहमदनगर (वृत्तसंस्था) जंगली प्राणी, पशु-पक्षी पाण्यासाठी वनवन भटकंती करत आहेत. त्यातच एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांने जंगलातील एका गुहेत जाऊन बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजतानाचा व्हिडिओ आता समोर (leopard cubs were watered) आला आहे. यात अकोले तालुक्यातील टाकळीत आढळून आलेल्या तीन बिबट्याच्या बछड्यांना वनकर्मचारी पाणी पाजत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. या आगळ्यावेगळ्या व्हि़डिओची सध्या चर्चा रंगली आहे.
अशा परिस्थितीत जंगली प्राणी, पशु-पक्षी हेदेखील पाण्याच्या शोधात आहेत. यातीलच हे बछडेही होते. हे बछडे पाण्याविना व्याकुळ झालेले आढळून आले. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात वनकर्मचारी अशोक घुले आणि त्यांचे सहकारी जंगलात खड्डे खोदण्याचं काम करत होते. यावेळी त्यांना बिबट्याच्या बछड्यांचा आवाज आल्याने ते गुहेच्या दिशेने गेले. त्याठिकाणी त्यांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले.
अशोक घुले यांनी ही माहिती वनक्षेत्रपाल प्रदिप कदम यांना दिल्यानंतर कदम यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. कर्मचारी अशोक घुले यांनी 3 महिन्याच्या बछड्यांना एका भांड्यात पाणी उपलब्ध करुन दिलं. यानंतर ते चक्क एका बिबट्याच्या बछड्याला बाटलीने पाणी पाजत असताना दिसले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट केला गेला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. घुले यांच्या या धकडाकेबाज तसेच डेरिंगबाज कामाचे पुन्हा एकदा प्राणी मित्र तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.