जळगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या सावखेडा बु. शिवारातील शाळा टार्गेट करत चोरट्यांनी चार शाळांमध्ये एकाच रात्री डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी विद्यार्थ्यांनी भरलेल्या शैक्षणिक फीसह शिष्यवृत्तीचे पैसे असा एकूण १ लाख ९४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २५ च्या सार्यकाळी ५ ते दि. २६ रोजी पहाटे ६ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी शाळांमध्ये चोरी करतांनाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांच्या टोळीमध्ये महिला देखील सहभागी असल्याचे दिसून आले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सावखेडा बु. शिवारात चार ते पाच शाळा असून याठिकणावरील संपुर्ण परिसर मोकाळा आहे. याठिकाणी असलेल्या वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक आशिष चंद्रकांत अजमेरा (वय ५३, रा. हरेश्वर नगर) यांनी पोलिसात तक्रार दिली. यामध्ये त्यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी या कक्षातील लोखंडी कपाटात विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्ती परीक्षेची रक्कम अशी एकूण १ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम स्टिलच्या पेटीत ठेवलेली होती. शाळा सुटल्यानंतर प्रशासकीय कक्षाला लॉक लावून ते नेहमीप्रमाणे घरी निघून गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या शाळेच्या ग्रीलच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर घटना उघडकीस
दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२५ वाजता अजमेरा शाळेत पोहोचले, तेव्हा त्यांना मुख्य आणि दुसऱ्या ग्रिल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना विचारपूस केल्यानंतर थेट अॅडमिन रूममध्ये धाव घेतली. तिथे कपाटाचे आणि स्टिल पेटीचे कुलूप तोडून आतील संपूर्ण रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले.
एकाच रात्रीत चार शाळांमध्ये धाडसी चोरी
शाळेत चोरी झाल्याची माहिती अजमेरा यांनी तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीसांचे पथक शाळेत आल्यानंतर त्यांच्याकडून चौकशी केली जात होती. दरम्यान, पोलिसांना याच परिसरात असलेल्या जी. एस. रायसोनी पब्लिक स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग विद्यालय व गुरुकुल किड्स या शाळांमध्येही मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचे समजले. बाचोरी प्रकरणी अजमेरा यांच्या फिर्यादीवरुन जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळांमधून गेलेली रक्कम
चोरट्यांनी सुरुवातीला वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चोरी केली. त्याठिकाणाहून चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपये, त्यानंतर चोरट्यांनी त्याच परिसरातील जी. एस. रायसोनी पब्लिक स्कूलमधून ४५ हजार रुपये तर विवेकानंदन प्रतिष्ठान संचलित शानबाग शाळेतून १३ हजार रुपये तर गुरुकुल किड्स शाळेतून १ हजार रुपये अशी एकू १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड घेवून चोरटे पसार झाले.
घटनास्थळाहून पुरावे संकलीत
घटनेची माहिती मिळाल्यानंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सीकच्या पथकाने घटनास्थळाहून पुरावे संकलीत केले असून त्यानुसार चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
चोरी करणारी टोळी बाहेरील राज्यातील
चार दिवसांपुर्वी एकाच रात्री चोरट्यांनी सहा दुकानांमध्ये धाडसी चोरी करीत तेथून सहा लाखांचा ऐवज चोरुन नेला. त्यानंतर आता पुन्हा एकाच रात्रीत चार शाळांमध्ये चोरटयंच्या टोळीने डल्ला मारीत ऐवज चोरुन नेला. या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये ही टोळी एकापेक्षा अधिक ठिकाणी चोरी करुन मिळेल तेवढा मुद्देमाल चोरी करीत आहे. त्यामुळे ही चोरी देखील बाहेरील राज्यातील टोळीने केल्याचा संशय पोलिसांना असून त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे.
काठीच्या मदतीने उघडले दार
चोरी करीत असतांना एका शाळेतील ऑफिसच्या दाराला आतून बंद असल्याचे चोरट्यांना दिसले. चोरट्यांनी एका काठीच्या मदतीने त्या ऑफिसचे दार उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी तेथील ऐवज घेवून तेथून पसार झाल्याचे उघड झाले आहे.
















