भुसावळ (प्रतिनिधी) महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, गाडीत बॉम्ब आहे’, असा संदेश लिहिल्याचे आढळताच भुसावळ रेल्वे स्थानकावर आज सकाळी मोठा गोंधळ उडाला. या घटनेने काहिकाळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या तत्काळ कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्स्प्रेसच्या एका कोचमधील शौचालयाच्या भिंतीवर ‘पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, गाडीत बॉम्ब आहे’, असा संदेश लिहिलेला दिसला. तो पाहताच प्रवाशांनी तत्काळ रेल्वे सुरक्षाबल अर्थात आरपीएफच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. तर भुसावळ स्थानकावर गाडी थांबताच रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संपूर्ण गाडीची श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. प्रत्येक डब्यातील साहित्य, आसन आणि शौचालयांची तपासणी करण्यात आली. तर प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. जवळपास १ तास चाललेल्या या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तु, स्फोटक साहित्य किंवा धोकादायक वस्तू आढळून आली नाही, असे आरपीएफने स्पष्ट केले. दरम्यान, प्रवाशांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
तपासणी पूर्ण झाल्यानंतर महानगरी एक्स्प्रेसला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनाने सर्व स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा प्रकारे खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे. तर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद वस्तू संदेश किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ रेल्वे सरक्षा दलाला माहिती द्यावी. तर अनावश्यक भीती पसरवू नये, असेही आवाहन केले आहे.















