मुंबई (वृत्तसंस्था) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसह राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलासा दिला आहे. ऐन दिवाळीत वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याची घोषणा केल्याने राज्यावर सणासुदीत काळोख होण्याची भीती होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच हा बोनस दिला जाणार आहे.
वीज कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात आणि ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात ऊर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन ऊर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिली. तर वीज कर्मचाऱ्यांचा संप होणार नाही त्यामुळे वीज ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान बोनसची रक्कम ही गेल्या वर्षी इतकीच असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस मिळाणार आहे. दीपावलीच्या उत्साही वातावरणामध्ये सर्व कर्मचारी संघटनांनी असे कुठलेही कृत्य करू नये ज्यामुळे वीज ग्राहकांना त्रास होईल. तरी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना मंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनानुसार विनंती करण्यात येते की, त्यांनी नियोजित संप रद्द करून प्रशासनास औद्योगिक शांतता कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असा संदेश महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा तत्वतः निर्णय मी घेतला असून रकमेची घोषणा आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये करण्यात येईल. सर्व संघटनांनी आपला संप रद्द करून वीज ग्राहकांना त्रास होईल, असे कृत्य करू नये असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले होते.