जळगाव (प्रतिनिधी) : शहरासह महाराष्ट्रातील विविध शहरात बालनाट्य चळवळ रुजवत ती बहरत ठेवण्याचे कार्य गेल्या ४८ वर्षांपासून करणारे रंगकर्मी, बालनाट्य लेखक – दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या निवडक बालनाट्य संहितांचे प्रकाशन आज (दि.८) सायंकाळी ६ वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृहात ज्येष्ठ अभिनेते पुष्कर श्रोत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
४५ हून अधिक बालनाट्य व १ दोन अंकी बालनाट्य लिहणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बालनाट्याच्या माध्यमातून बालकांचे भावविश्व फुलवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी लिहिलेल्या बालनाट्यातून अभिनय साकारलेले बालकलावंत आज चित्रपट व व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असून, त्यांचे लेखन अधिकाधिक बालनाट्य संस्था व दिग्दर्शकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या निवडक संहितांचे प्रकाशन शहरातील श्रेयस प्रकाशनातर्फे करण्यात येत आहे. भैय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक चित्रपट निर्माते पुष्कर श्रोत्री यांच्यासह माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, भूगर्भशास्त्रज्ञ सौ.संपदा जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
शहरातील रंगकर्मी, बालकलावंत, रसिक व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक अंजली धारु, श्रेयस प्रकाशनच्या डॉ.श्रध्दा पाटील व बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.
















