नांदेड (वृत्तसंस्था) नांदेड- अर्धापूर- वारंगा महामार्ग क्र. ३६१ या सिमेंटच्या रस्त्यावर वसमत फाट्यावर कच्च्या रस्त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात दोन तरुणांना आपले जीव गमवावा लागलाय. भरधाव येणाऱ्या चारचाकी जीपने दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. त्यात शाहबाजखान युसुफखान पेंटर (३०) आणि युनूसखान युसुफखान, (२७) (दोघे रा. खडकपुरा नांदेड) यांचा समावेश आहे.
अर्धापूर-नांदेड महामार्ग क्र. ३६१ वर नांदेड येथील दोन युवक शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान नांदेडहुन अर्धापूरला जेवणासाठी येत होते. वसमत फाटा येथे कच्च्या व खड्डयांच्या रस्त्यावर अर्धापूरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक क्र. (आरजे १७ जी ए – ५५०१) च्या पाठीमागे शाहबाजखान युसुफखान पेंटर, युनूसखान युसुफखान हे दोघे आपल्या दुचाकी (क्र. एमएच २६ एपी ८८४०) वरुन जात होते.
समोर ट्रक आहे व रस्ता कच्चा असून खड्डयांचा असल्याने दुचाकी हळूहळू चालवत असताना सिमेंट रस्त्यावरुन भरधाव येणाऱ्या चारचाकी जीपने दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. त्यामुळे ही दुचाकी समोरच्या ट्रकवर जोरात आदळली. यात दोघा दुचाकीस्वारांना जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. समोर कच्चा व खड्डयांच्या रस्त असल्याचा अंदाजच आला नसल्याने चारचाकी जीप धडकून हा अपघात घडला. अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.