जळगाव (प्रतिनिधी) रस्त्यामध्ये लागलेली मोटरसायकल बाजूला करण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांना तिघांनी मिळून बेदम मारहाण करून घरातील वस्तूंची तोडफोड केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात विनोद भानुदास सोनार (रा.जानकीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तुकाराम वाडीमधून मोटारसायकलने घरी जात असताना ठाकूर किराणा जवळ रस्त्यामध्ये एक मोटारसायकल लावलेली होती. त्या मोटर सायकलवर बसलेला व्यक्तीस मी बोललो की, मोटरसायकल थोडी बाजूला घ्या, मला पुढे जायचे आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने मोटारसायकल पुढे घेतली व मी पुढे जाऊ लागलो. परंतू तेवढ्यात तेथे उभ्या असलेल्या पाच ते सात व्यक्तींमधील भूषण उर्फ जांग्या (पूर्ण नाव माहित नाही) हा मला बोलला की तुझ्या बापाचा रस्ता आहे का?. त्यानंतर भूषणने मला शिवीगाळ केली. मी त्याला शिवीगाळ का करतोय?, असे बोलताच भूषणे रस्त्यावर पडलेली वीट माझ्या डाव्या पायावर जोरात मारली. त्यामुळे मी माझी दुचाकी घेऊन तिथून निघालो. परंतू माझ्या घरापर्यंत भूषण उर्फ जांग्या, दादू, बबल्या, असे माझ्या घरापर्यंत पळत आले. त्यानंतर त्यांनी घराजवळ मला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर भूषणने माझ्या डोक्यावर पुन्हा एकदा वीट मारली. भांडणाचा आवाज आल्याने आई-वडील घराबाहेर मला सोडवण्यासाठी आले, असता तिघांनी माझ्या वडिलांना देखील आता बुक्क्यांनी मारहाण करून आईला शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही घरात घुसत असताना तिघांनी अनधिकृतपणे आमच्या घरात घुसून शिवीगाळ करत घरातील फ्रीज, फरशी, पाण्याचा माठ, अशा सामानाची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी भादवि कलम ३२४,४५२,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे हे करीत आहे.
















