ग्वाहलेर (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ५८ वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या घडवून आणल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनी ट्रॅपमध्ये अडकवून स्वत:च्या वडिलांची हत्या करुन घेतली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील तृप्ती नगरमध्ये राहणारे रविदत्त दुबे (वय ५८) यांची हत्या झाली होती. पोलिसांनी या हत्येची माहिती समजतात मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला आणि तपास सुरू केला. दुबे यांची हत्या ते झोपेत असताना झाली होती. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांवरच संशय होता. दुबे हत्या झाली त्या रात्री कुटुंबासोबत घरातील पहिल्या मजल्यावर झोपले होते. त्यांच्यासोबत पत्नी, दोन मुली आणि मुलगा होता. रात्री उशीरा खोलीत मोठा आवाज झाला. या आवाजाने घरातील व्यक्ती जागे झाले तेव्हा दुबे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांना दुबे यांच्या १७ वर्षांच्या मुलीवर संशय आला. पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स चेक केल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी मागील १५ दिवसांपासून एका विशेष नंबरच्या संपर्कात असल्याचं त्यांना आढळले. पोलिसांनी त्या नंबरचा तपास केल्यानंतर तो नंबर त्याच भागातील पुष्पेन्द्र या तरुणाचा असल्याचे समजले. त्याचवेळी या मुलीचे करन राजौरीया मुलाशी अफेयर होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.
बॉयफ्रेण्डच्या मित्राकडून खून
या माहितीनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड करनची चौकशी केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पुन्हा एकदा मुलीची उलटतपासणी केली. या उलटतपासणीमध्ये या मुलीनं हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. आपण करनला भेटताना एकदा वडिलांनी पाहिलं होतं. त्यावेळी वडिलांनी तिला घरी नेऊन मारहाण केली होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांवर संतापली होती. तिने बॉयफ्रेंड करनला वडिलांची हत्या करण्यासाठी सांगितले. मात्र करननं हा गुन्हा करण्यास नकार दिला. त्यानंतर या मुलीनं करनचा मित्र पुष्पेन्द्र लोधीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्याला तिनं वडिलांची हत्या करण्यासाठी तयार केले. या मुलीनं ४ ऑगस्ट रोजी रात्री पुष्पेंद्रला घरी बोलावून त्याच्याकडून वडिलांची हत्या करुन घेतली. पोलिसांनी ही अल्पवयीन मुलगी आणि पुष्पेंद्र या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.