चोपडा (प्रतिनिधी) चोपडा पासून शिरपूरकडे १० ते १२ किलोमीटर अंतरावर बुधगाव फाट्याचे पुढे रंगत हॉटेलजवळ कापसाचे बियाणे भरलेली गाडी थांबवून दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी दरोडेखोरांनी गाडीचे नुकसान करून ६० हजार रुपये लांबविले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात हेमुभाई पोपटभाई अनियालिया (वय ३९ रा. देवलीया ता. थान जि. सुरेंद्रनगर राज्य गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २५ मे २०२२ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हेमुभाई हे आपल्या ताब्यातील गाडी क्रमांक (जि.जे ०३ ए. टी ०२१८) मध्ये अंकुर कापसाचे बियाणे भरून अहमदाबाद येथे जात होते. यावेळी रवींद्र राजेंद्र कोळी, राहुल एकनाथ पाटील, सोनू ज्ञानेश्वर कोळी, भुरा गोकुळ कोळी, गजू पाटील, रविंद्र सुरेश कोळी (रा. वर्डी ता. चोपडा) यांनी पांढऱ्या रंगाची टाटा मॅजिक कंपनीची गाडी क्रमांक (MH १९, AX ८२२५) ने हेमुभाई यांच्या गाडीला ओव्हरटेक करून गाडी थांबविली. तसेच हेमुभाई चालवत असलेल्या गाडीचे ड्रायव्हर साईडकडील समोरील काच व क्लिनर साईडकडील हेडलाईट फोडले. तसेच हेमुभाई यांच्याकडील ५० हजार रुपये रोख व केबिनमधील १० हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या असा एकूण ६० हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.