भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करत परिवारातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना दि. १५ रोजी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहित आपल्या राहत्या घरात दि. १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे काम करत होती. यावेळी रवींद्र रणजित चव्हाण याने दारूच्या नशेत पिडीत विवाहितेच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर पिडीतेने तु घरात कशासाठी आला?, असे विचारताच रवींद्र चव्हाण याने पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच चापटाबुक्यांनी मारहाण केली. पिडीतेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोकं धावून आले. यावेळी रविंद्र याचा काका चरणदास गणपत राठोड हा देखील हातात काठी घेवून आला व त्याने पिडीत विवाहितेचा भाऊला पाठीवर, डावे हातावर, डोक्यावर मारहाण केली. तसेच पिडीतेची वाहिनी भांडण सोडविण्यास गेली असता तिला देखील मारहाण करण्यात आली. थोड्यावेळाने गावातील लोकांनी सोडवा सोडव केली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात रवींद्र चव्हाण, चरणदास राठोड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमलदार पोहेका हिरालाल नारायण पाटील हे करीत आहे.