मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्याच अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. (Anil Deshmukh News)
सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयनं न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती.
देशमुख यांच्यावर आरोप काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने तपास सुरु केला आणि त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर चौकशीअंती अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यानंतर बदल्या व नियुक्त्यांसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात सीबीआयने ६ एप्रिल २०२२ रोजी त्यांना अटक केली. २ जून २०२२ रोजी एका प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. आणखी दोन प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले नाही. तेव्हापासून अनिल देशमुख कारागृहात आहेत.