जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणात अटकेतील संशयितांना आज जळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोमवार, शनिवार पोलीस स्थानकात हजेरी आणि दुध संघाच्या आवारात आरोपपत्र दाखल होईपर्यंत जाता येणार नाही,या अटीशर्थींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा दूध संघात बेकायदेशीरपणे स्निग्ध पदार्थ (स्पॉइल्ड फॅट) बनवल्याचा प्रकरणात सहा संशयितांना अटक करण्यात आली होती. सुरुवातील पोलीस कोठडी मिळाल्यानंतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या सर्व संशयितांनी मंगळवारी जामिनासाठी अर्ज केले होते. त्यावर २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर आज एमडी मनोज लिमये, हरी पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल व चंद्रकांत पाटील या सहा जणांना कोर्टाने अटीशर्थींवर न्या. आर.जे.खंडारे यांनी जामीन मंजूर केला.
संशयितांना सोमवार, शनिवार पोलीस स्थानकात हजेरी आणि दुध संघाच्या आवारात आरोपपत्र दाखल होईपर्यंत जाता येणार नाही. साक्षीदारांवर दबाव आणू नये, या अटी कोर्टाने घालून दिल्या आहेत. दूध संघाने हे बी ग्रेड तूप असल्याची माहिती दिली होती; परंतु अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली असता ते मानवी आरोग्यास हानीकारक असे स्निग्ध पदार्थ असल्याचा अहवाल दिला होता. परंतू पोलिसांनी त्याअनुषंगाने लावलेले ३२८ हे कलम अॅप्लीकेबल होत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. जामीन मिळण्यासाठी हाच मुद्दा महत्वाचा ठरल्याचे कळते.















