धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील प्रसिद्ध उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या जीएस उद्योग समूहावर केंद्रीय जीएसटीच्या पथकाने छापेमारी केल्याने जिल्ह्यातील राजकीय तथा व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी सकाळी दहा वाजेपासून नाशिक येथील केंद्रीय जीएसटीच्या पथकाने जीएस उद्योग समूहाच्या दोन जिनिंग, दोन फॅक्ट्री आणि गावातील मुख्य ऑफिसवर एकाच वेळी छापेमारी केली. साधारण १५ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथक सकाळी १० दहा वाजेच्या सुमारास तीन वाहनांमधून गावात धडकले. यावेळी त्यांनी आल्याबरोबर दोघं फॅक्ट्री सीज केल्या. त्यानंतर त्यांनी जीएसटीशी निगडीत कागदपत्र तपासायला सुरुवात केली. साधारण २०१२ पासून पथकाने कागदपत्रांची तपासणी केलायचे कळते. मध्यरात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती.
यावेळी पथकाने मार्केट कमेटीशी निगडीत कागदपत्र देखील तपासली. मार्केट फी वेळेवर भरली आहे का?, याची पथकाने जीएस उद्योग समूहाच्या खाजगी मार्केटची तपासणी केली असता त्यांना २०१२ पासून तर डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व मार्केट फी भरली असल्याचे आढळून आल्याचे कळते. मध्यरात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु असल्यामुळे गावात एकच चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे पुढील काही दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या कारवाई मागे राजकीय हस्तक्षेप असल्याची गावात जोरदार चर्चा होती. दरम्यान, गावातील राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
आम्ही आलेल्या पथकाला संपूर्ण सहकार्य केलेले आहे. त्यांना हव्या असलेल्या सगळ्या कागद पत्रांची पूर्तता केलेली आहे. तपासणी दरम्यान, आम्ही संपूर्ण सहकार्य केले असून यानंतरही त्यांना सहकार्य केले जाईल. पथकाला काहीही चुकीचे आढळलेलं नाही.
– निलेश चौधरी (माजी नगराध्यक्ष तथा संचालक जी.एस. उद्योग समूह)