मुंबई (वृत्तसंस्था) दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी दिशाच्या कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचा महिला आयोगाला रिपोर्ट सादर झाल्यानंतर रात्री 12 वाजता मालवणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ती गरोदर नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात लाखोंच्या संख्येने निर्माण करण्यात आलेल्या बोगस ट्विटर हॅण्डलची देखील चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला होता. राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी होत आहे, त्यांनी तिची बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन सालियन कुटुंबीयांनी केलं होतं. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.