नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आल्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित ‘मनी लाँन्डिंग’ प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेली आहे.
राजधानी दिल्लीतील वादग्रस्त मद्यधोरणाशी संबंधित प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावलेले असतानाही केजरीवाल अनेकदा गैरहजर राहिले. याप्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून नऊ वेळा समन्स बजाविण्यात आले होते. परंतु केजरीवाल यांनी एकाही समन्सला उत्तर दिलेले नव्हते. अखेर २१ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याकरिता केजरीवाल यांना नववे समन्स बजाविण्यात आले आहे. परंतु आजही त्यांनी उत्तर न दिल्याने अखेर गुरूवारी रात्री त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.