मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं (ED) समन्स बजावल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. उद्या संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे ते उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्राचाळ घोटाळा काय?
2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प 2008 मध्ये सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला 1 हजार 34 कोटींना फसवले होते. बिल्डरने विक्रीचे क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप आहे. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.
















