जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील मेहरूण परिसरात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा कसून शोध सुरु केला असून अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांना पोलीस संरक्षण मिळणार असल्याचे कळते.
जळगाव जिल्ह्यात याआधीही मुक्ताईनगर बोदवडमधून निवडणूक लढणारे उमेदवार विनोद सोनवणे यांच्या वाहनावरही गोळीबारची घटना घडली होती. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. गोळीबारामुळे काचा फुटल्या, त्याचा आवाज झाल्यानंतर अहमद हुसेन यांचे कुटुंब जागे झाले. तीन राऊड फायर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आले असल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगीतले.
तर प्रचारामुळे थकल्यामुळे लवकर झोपलो होती. मी जळगावच्या विकासावर निवडणूक लढत आहे. काही भ्याड लोकांनी हा हल्ला केला. मी कुणालाही घाबरणार नाही. माझा प्रचार सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांनी दिली आहे.