हैदराबाद (वृत्तसंस्था) स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा प्रकरणी आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली. तसेच त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आंध्रप्रदेशसह देशाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चंद्राबाबू नायडू यांना 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. ईडीच्या तपासात हा घोटाळा सिद्ध झाला आहे. 241 कोटी रुपयांचा निधी शेल कंपन्यांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी 8 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. 250 कोटींच्या घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरोधात 2021 मध्ये सर्वात आधी एफआयआर दाखल झाला होता. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नंदयाला रुग्णालयात दाखल केले आहे. तिथून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
नंद्याल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि सीआयडी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचा मोठा फौजफाटा शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये नायडूंना ताब्यात घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी ते कॅराव्हॅनमध्ये विश्रांती घेत होते. त्याठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी पोलिसांना तीव्र प्रतिकार केला. चंद्राबाबू नायडूंचे रक्षण करणार्या एसपीजी दलांनीही पोलिसांना परवानगी दिली नाही. नियमानुसार पहाटे साडेपाच वाजेपर्यंत कोणालाही नायडूंपर्यंत पोहोचू दिलं जाऊ शकत नाही, असं कारण एसपीजीने पुढे केलं. अखेर सकाळी सहा वाजताच्या सुमारास, पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्या कॅराव्हॅनचे दरवाजे ठोठावले, त्यांना खाली आणले आणि अटक केली.