चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री पोलिसांनी एका क्रूझर वाहनातून तब्बल ३२ किलो गांजा जप्त करत चार आरोपींना अटक केली. या कारवाईत अंदाजे ३ लाखांचा गांजा व १२ लाख रुपये किमतीची क्रूझर गाडी असा १५ लाखांचा एकूण ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिस गस्तीदरम्यान रात्री ३ वाजेच्या सुमारास ही कारवाईj करण्यात आली. आरोपींमध्ये राहुल पावरा, अख्तरसिंग पावरा, रवींद्र पावरा व पहाडसिंग पावरा (सर्व रा. शिरपूर, जि. धुळे) यांचा समावेश आहे.
यापूर्वी बुधवारी चाळीसगाव शहरातच ७ लाखांचा गुटखा पकडण्यात आला होता. अवघ्या काही तासांत दुसऱ्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजासुद्धा पकडल्यामुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर व विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पवन पाटील, भूपेश वंजारी, नितीन वाल्हे, निलेश पाटील, दीपक चौधरी, विजय महाजन व प्रवीण पवार यांनी केली.