जळगाव (प्रतिनिधी) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात ‘PFI’ शी संबंधित एकाविरुद्ध जळगाव एटीसीने कारवाई करत अटक आहे. उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव), असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. पटेल विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसून सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव दहशतवाद विरोधी शाखा, एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या यांच्या संयुक्त पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधित उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव) याला पहाटे साडे तीन वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण होता. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले होते. तर पटेल याला सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करत कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
दरम्यान, २२ सप्टेबर रोजी दहशतवादी विरोधी पथकाने (एटीसी)मेहरुणमधील दत्त नगरातील एका धार्मिकस्थळावर छापा टाकून अब्दुल हद्दी अब्दुल रौफ (वय ३२,रा.रमहेमान गंज, जालना) (Abdul Hadi Abdul Rauf) याला ताब्यात घेतले होते. अब्दुल हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचा महाराष्ट्रातील खजिनदार तसेच जालना जिल्ह्याचा सोशल मिडिया प्रमुख होता. दरम्यान, आता पटेल याला पहाटेच ताब्यात घेण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
औरंगाबादेतून 13 जण ताब्यात
औरंगाबादमध्ये आज पहाटे पीएफआयशी संबंधित १३ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये काही पीएफआयचे सदस्य आहेत तर काही सचिव आहेत. या सर्वांवर गेल्या काही दिवसांपासून पोलिस नजर ठेवून होते. यानंतर शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. शहरातून १३ तर मराठवाड्यातून इतर ठिकाणाहून ७ असे तब्बल २१ लोकांना अटक झाली आहे. पहाटे 3 वाजता हे कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. या सगळ्यांना आज दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार ही प्रतिबंधतामक कारवाई असल्याची माहिती मिळत आहे.
मालेगाव मधूनही दोघांना घेतले ताब्यात
मालेगाव शहरातील पीएफआय संघटनेशी संबंधित असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पीएफआयचे माजी अध्यक्ष मोहम्मद इरफान दौलत नदवी, रशीद शहदैन शहीद इकबाल यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे.