जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे शुक्रवारी रात्री एक गुटख्याने भरलेला ट्रक एलसीबीने पकडल्यानंतर तेथेच गुन्हा दाखल न करता तो जळगावला आणला जात होता. या ट्रकमधील गुटखा कमी दाखवून गुन्ह्याची तीव्रता कमी करणार असल्याची गुप्त माहिती आ. मंगेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्रभर पाठलाग करून हा ट्रक जळगाव जवळ पहाटे पकडला. याबाबत आ. चव्हाण यांनी पोलिसांना जाब विचारात फिर्याद घेण्याची विनंती केली. परंतू पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केल्यामुळे आ. चव्हाण यांनी गुटख्याची विल्हेवाट लावणे, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालक, मालकासह चक्क एलसीबी, जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक आणि मेहुणबाऱ्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारींविरुद्ध फिर्याद दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल न झाल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा देखील आ.चव्हाण यांनी दिला आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांची फिर्याद जशीच्या तशी
मी नामे श्री.मंगेश रमेश चव्हाण, वय – ३७, व्यवसाय – शेती / उद्योग, रा.चाळीसगाव मो.क्र.९६२३५५५५४४, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. मी जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जसे की जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव विभाग, चाळीसगाव, पोलीस उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव तसेच मा.गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांस वारंवार माझ्या चाळीसगाव मतदारसंघातील, शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे व मेहुणबारे पोलीस ठाणे च्या हद्दीत अनेक प्रकारचे अवैध धंदे जसे की, सट्टा, जुगार, बेकायदा पत्त्यांचे क्लब, गुटखा, गांजा, अवैध देशी दारू, बनावट दारू इत्यादी बाबत वारंवार लेखी व तोंडी तक्रारी देऊन अवैध धंद्याच्या सद्यस्थितीबाबत अवगत केलेले होते व आहे. मतदारसंघातील नागरिकांनी या अवैध धंद्यांबाबत मला लेखी व तोंडी तक्रारी दिल्या आहेत. त्यानुषंगाने मी देखील प्राथमिक चौकशी करून मा.मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकारी यांना तक्रारी दिल्या होत्या. परंतु उपरोक्त तक्रारी दिल्यानंतर देखील सबंधित जबाबदार अधिकारी यांनी त्याकडे कानाडोळा करून सदरील अवैध धंद्यांना संरक्षण देऊन खुलेपणाने सुखनैव चालू ठेवलेले होते व आहेत. अशी परिस्थिती असताना मी आमदार या नात्याने सबंधित अधिकाऱ्यांना बजावले होते की आपण जर सदरील अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई केली नाही तर मला स्वतःला रस्त्यावर उतरून कारवाई करणे भाग पडेल. परंतु लोकप्रतिनिधींनी बजावून देखील सबंधित पोलीस अधिकारी यांनी त्याबाबतीत कुठलीही कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांचे अंकित पथकाने देखील मागील आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील सट्टा – जुगार च्या अड्ड्यांवर धाडी टाकून कारवाई केली. मात्र सदरील कारवाई देखील थातुरमातुर स्वरुपाची होती. त्या कारवाई मुळे सदरील सट्टा, जुगार व इतर अवैध धंद्यांना कुठल्याही प्रकारचा लगाम लागलेला नाही. त्यानंतर मला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग जळगाव व मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री.बेंद्रे व चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुरेश शिरसाठ यांनी सुमारे ३५ ते ४० लाख रुपये किमतीचा गुटखा असलेली गाडी अडवून त्यांनतर आर्थिक देवाणघेवाणाची तडजोड करीत असल्याचे कळाले. त्यानंतर मी माझ्या वाहनाने आर्वी – शिरूड चौफुली मार्गे मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचलो असता सदरील वाहन सोडून दिले असल्याचे कळाले व वाहन जळगाव कडे गेले असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर सदरील वाहनाचा पाठलाग करून ते वाहन व त्यातील गुटखा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणला असता ठाणे अमलदार यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मा.पोलीस अधिक्षक सो यांनादेखील दखलपात्र गुन्ह्याबाबत माहिती दिली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली, मी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गुटखा असलेल्या वाहनासह गेलो असता फिर्याद नोंदवून घेतली नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने ललिता वि. उत्तर प्रदेश राज्य या खटल्यात पोलिसांना दखलप्राप्त गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते नोंदवून घेणे बंधकारक असते असा स्पष्ट न्यायनिवाडा दिलेला आहे, परंतु मी लोकप्रतिनिधी असताना देखील फिर्याद नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक फिर्याद नोंदविण्यास गेले असता त्यांचे काय हाल होत असतील याची कल्पना येते. त्यामुळेच मला भारतीय दंडप्रक्रिया संहितेच्या कलम १५४ (३) नुसार इमेल द्वारे निम्नलिखित फिर्याद देणेक्रमप्राप्त होत आहे.
माझी फिर्याद येणेप्रमाणे,
दि.१६/१०/२०२० रोजी रात्री १०.३० मी मित्रांसोबत मुंबई येथे जात असताना हॉटेल चेतना येथे जेवण घेण्याकरिता थांबलो होतो. त्यावेळेस माझ्या फोनवर गुप्त माहिती मिळाली की MH18 M 0553 या मालवाहक ट्रक मधून सुमारे ३५ ते ४० लाख रुपये किमतीचा गुटखा वाहून नेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत सदरील वाहन अडविले आहे व त्यात अवैध व बेकायदेशीर गुटखा असल्याची खात्री केली आहे. त्यानंतर सदरील कर्मचाऱ्यांनी सबंधित व्यक्तींशी आर्थिक देवाणघेवाण करून सदरील वाहन हे सोडून दिले आहे. याबाबतची माहिती मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक श्री.बेंद्रे यांना व चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुरेश शिरसाठ मिळाल्यानंतर सदरील वाहन जप्त करून त्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्याची कारवाई न करता आर्थिक देवाणघेवाण करून ते वाहन सोडून दिले.
मी घटनास्थळावर माझ्या इंडिव्हेअर गाडी क्र.MH 19 DQ 7777 ने आर्वी – शिरूड चौफुली मार्गे घटनास्थळी साधारणता रात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास माझ्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सदरील वाहनाचा शोध घेतला सदरील वाहन मिळून आले नाही. त्यानंतर मी याबाबत श्री.गोरे, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली असता त्यांनी असा काही प्रकार झाल्याची माहिती माझ्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर मी माझ्या गुप्त बातमीदारास तू मला चुकीची माहिती दिली किंवा कसे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे कर्मचारी व मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. सचिन बेंद्रे व चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुरेश शिरसाठ त्यांचे कर्मचारी यांनी मिळून सदरील वाहन हे आर्थिक देवाणघेवाण अंती सोडून दिले एवढेच नव्हे तर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सदरील वाहन हे जळगाव येथे विना अडथळा पोहचविण्यासाठी वाहनामागे रवाना झालेले आहेत अशी माहिती त्याने दिली त्यामुळे सदरील माहितीची सत्यता पडताळणी करता मी माझे उपरोक्त क्रमांकाची इंडिव्हेअर या गाडीतून चाळीसगाव हुन पाचोरा मार्गे जळगाव कडे निघालो त्यानंतर आम्ही दिनांक – १७/१०/२०२० भल्या पहाटे सदरील वाहनाला जळगाव येथे पाचोरा रोड वरील जैन हिल्स येथे अडविले असता, मी सदरील ट्रकचे ड्रायव्हर व क्लिनर यांच्याकडे चौकशी करत असताना तेथे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी येऊन त्यात हस्तक्षेप करू लागले व काही कारवाई करू नये अशी विनंती करू लागले. त्याची मोबाईल वर रेकॉर्ड केलेली ध्वनिचित्रफीत माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर मी ड्रायव्हर कडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरील वाहन हे मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरवाडे बारी येथे रात्री ८ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व मेहुणबारे पोलीस स्टेशन प्रभारी यांनी अडविले व मालकांशी दूरध्वनीवर चर्चा करून सोडून दिले असल्याचे सांगितले. त्यांनंतर तेथे उपस्थित असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हे वाहन आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने जळगाव कडे आणले असल्याचे त्यांनी मला सांगितले. मी तातडीने याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना भ्रमणध्वणी वर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. असता त्यांनी सांगितले की मला याबाबत काही माहिती नसून याबाबत चौकशी करतो असे सांगितले.
त्यानंतर मी जवळपास २ तास तेथे उपस्थित पोलिसांशी चर्चा करून सदर वाहन जप्त करण्यात यावे व त्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात यावे असे सांगितले असता स्थानिक पोलिसांनी आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाने सदर वाहन व मुद्देमाल हा मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे नेत असल्याचे सांगितले. मी याला तीव्र विरोध केला असता शेवटी हे वाहन जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. तेथे माझी फिर्याद दाखल करून घेण्याची विनंती केली असता जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी आम्हाला फिर्याद दाखल न करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असल्याचे सांगितले.
तरी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर व प्रतिबंधित असलेला गुटख्याच्या वाहनाची मेहुणबारे पोलीस स्टेशनला नोंद न करता त्यातील बेकायदेशीर गुटख्याची विल्हेवाट लावणे, पुरावा नष्ट करणे या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालक मालक, गुटखा ज्याठिकाणाहून आला, ज्या ठिकाणी पोहचणार होता ते सर्व संबंधित, तसेच त्यास सहकार्य करणारे सर्व संबंधित गुन्हे अन्वेषण शाखा व मेहुणबारे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात माझी फिर्याद देत आहे. सदर दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद दाखल करून न घेतल्यास मला मा.उच्च न्यायालयात जाणे क्रमप्राप्त ठरेल.