अहमदाबाद (वृत्तसंस्था) 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी ( RAHUL GANDHI ) यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
मोदी नावावर टीका केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात सुरत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टीका करताना म्हटले होते की, सर्व चोरांची नावे मोदी कशी काय?, कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर गांधी यांनी तातडीने जामीनासाठी अर्ज देखील केला आणि न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित देखील केली.निर्णय देण्याआधी कोर्टाने राहुल गांधी यांना विचारले की, तुम्हाला यावर काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल गांधी म्हणाले, मी नेहमी भ्रष्ट्राचाराच्या विरोधात बोतो. मी कोणाविरुद्ध मुद्दाम बोललो नाही. यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही.
राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितलं की, मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि निकालाची तारीख 23 मार्च निश्चित केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल गांधी ऑक्टोबर 2021 मध्ये सुरत कोर्टात त्यांचे म्हणणं नोंदवण्यासाठी हजर झाले होते.