नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी हा निकाल उद्याच लागणार असल्याचं आज जाहीर केलं आहे. लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “उद्या दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी १२ वाजता करण्यात यावी. कारण, उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत”, असं सरन्यायाधीश यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितलं. दरम्यान, उद्या सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांचं निलंबन होणार का, कोर्टाकडून घड्याळाचे काटे उलटे फिरवले जाणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निकालानंतर शक्यता काय?
सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगेचच राजीनामा द्यावा लागेल. तसेच नव्याने सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु होईल. किंवा एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 6 महिन्यात पुन्हा कुठल्यातरी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणूक यावे लागेल. तर काहींच्या मते पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. तसेच आमदारा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला गेला तर पुढील निवडणुकीपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. अगदी निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाला पुनर्विचार याचिका दाखल करुन पुन्हा कोर्टात दाद मागू शकते.
अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर