जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या घोटाळ्यात मागील तीन महिन्यापासून अटकेत असलेला संशयित सुरज सुनील झंवरला सुप्रीम कोर्टाने नुकताच जोरदार झटका दिला आहे. मला देण्यात आलेली नऊ दिवसांची पोलीस रिमांड बेकायदेशीर असल्याबाबत निकाल द्यावा, अशी सुरजची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत अर्जात तथ्य नसल्याचे सांगून योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याच्या सूचना त्याला दिल्या आहेत.
बीएचआर घोटाळ्यात मागील तीन महिन्यापासून सुरज सुनील झंवर हा कोठडीत आहे. सुरजने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला नऊ दिवस ठेवलेल्या पोलीस कोठडीला बेकायदेशीर ठरवावे, अशी याचिका दाखल केली होती. सुरजकडून न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. परंतु सुप्रीम कोर्टाने सुरजच्या अर्जात तथ्य नसून या संबंधी संपूर्ण तथ्य आमच्या समोर येत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निकाल देऊ शकत नाही. त्यामुळे अर्जदाराने योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. एवढेच नव्हे, तर कोर्टाने जामीन अर्ज दाखल केल्यापासून एका आठवड्यात निकाल द्यावा, असेही म्हटले आहे. दरम्यान, सुरज झंवरचा जामीन अर्ज कोर्टाने याआधी फेटाळून लावलेला आहे.