पुणे (वृत्तसंस्था) गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धमकावल्याचा खळबळजनक आरोप सीबीआयने पुणे मोक्का न्यायालयात केला आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जळगावचे विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणात धमकीचा आरोप होता,असा धक्कादायक अहवाल सीबीआयने पुणे मोक्का कोर्टात सादर केला.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक प्रकरण समोर आलं असून त्यामुळे देशमुखांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्या प्रकरणात सीबीआयने सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला असून त्यामध्ये अनिल देशमुख यांनी एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याचा दावा केला आहे.एवढेच नव्हे तर, अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अशी माहिती सीबीआयची कोर्टामध्ये दिली.
गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या, असे आदेश अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना दिले होते. पण हा गुन्हा जळगावच्या हद्दीत नाही, त्यामुळे पुण्यात हा गुन्हा नोंदवावा अशी भूमिका तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांनी घेतली. परंतु गृहमंत्री अनिल देशमुखांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही, त्यांनी गुन्हा नोंदवून घ्यायला भाग पाडल्याचा आरोप आहे. प्रवीण मुंडे यांनी याबाबतची कबुली सीबीआयला दिली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्याविरोधात विजय भास्करराव पाटील यांनी तक्रार दिली होती. तक्रारदार येण्यापूर्वीच मला अनिल देशमुख यांचा फोन आला. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येऊन माहिती देतील, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते. त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबाबत सांगितले आणि सांगितले की, अनिल देशमुख यांचा एफआयआर दाखल करण्याचा आदेश आहे.” मी त्याला पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितले कारण तो सांगत असलेली घटना जळगावच्या हद्दीतील नव्हती. मात्र, तक्रारदाराने तसे करण्यास नकार दिला.
आठवडाभरानंतर अनिल देशमुख यांनी पुन्हा फोन केला. त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवण्यास सांगितले. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तक्रारदाराच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि गृहमंत्र्यांच्या थेट फोन फोनमुळे मी संपूर्ण घटना नाशिक आयजी कायदा व सुव्यवस्था आणि एडीजी कायदा व सुव्यवस्था यांना कळवली. मुंढे यांनी पुढे म्हटले की, “एका आठवड्यानंतर अनिल देशमुख यांनी पुन्हा फोन केला. यावेळी त्याने मला धमकावले आणि एफआयआरसाठी मला तीनदा फोन का करावा लागला, अशी विचारणा केली. गृहमंत्र्यांच्या सततच्या धमक्यांमुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोणतीही घाई नसतानाही अनिल देशमुख यांच्या दबावाखाली शून्य एफआयआर नोंदवण्यात आल्याचेही मुंढे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. गिरीश महाजनांवर कशाप्रकारे मोक्का लागला पाहिजे, असं त्या आरोपपत्रात स्पष्ट सांगण्यात आलं आहे. गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत. यासाठी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. हे गुन्हे दाखल करायला लावले. यांसंदर्भातले ऑडिओ, व्हिडीओ पुरावे मी स्वत: दिले होते. त्यावर सीबीआयकडे केस दाखल झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहीत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे याची मोडस ऑपरेंडी होती, हे आपण सर्वांनी नीट पाहिलं आहे.