नशिराबाद (प्रतिनिधी) आज माघारीच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूकीतून नशिराबादमधील सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे. लवकरात लवकर नशिराबाद नगरपंचायत व्हावी, यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी दिली.
२९ डिसेंबर २०२० रोजी नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची उद्घोषणा नगर विकास विभागाने केल्यानंतर गावकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष व आनंद व्यक्त केला होता. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक लढायची की, नगर पंचायत होवू द्यायची, अशा द्विधा मनस्थितीत नशिराबादकर होते. नगरपंचायत होणारच; पण ग्रामपंचायत निवडणूक खर्चही होईल म्हणून निवडणूक आयोगाकडे नगर विकास खात्याने ग्रामपंचायत निवडणूक पुढे लांबवावी म्हणून पत्र देण्यात आले होते. परंतू ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया कायम राहिली. त्यामुळे नाशिराबादकरांनी आज एकत्र येत निवडणुकी न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज निवडणुकीतून सर्व ८२ उमेदवारांनी आज माघार घेतली. नगरपंचायतीच्या निर्णयाचे आम्ही सर्वांनी स्वागत केले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणूक स्थगितीबाबत शासनाने कुठलीही भूमिका जाहीर न केल्यामुळे आम्ही हा, निर्णय घेतल्याचेही मुकुंदा रोटे यांनी सांगितले.