धुळे (प्रतिनिधी) ‘पेसा’ मधून ‘नॉन पेसा’मध्ये बदली होण्याकरीता लाचेची मागणी करुन ३५ हजारांचा पहिला हप्ता स्विकारतांना जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश दिनकर साळुखे व शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक विजय गोरख पाटील या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिक विभागाने ही कारवाई केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण !
तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा, रामपुरा ता. शिरपुर येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची पेसामधुन नॉनपेसमध्ये बदली होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून आदेश पारित झाले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी धुळे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदली होण्यासाठी विनंती अर्ज केला होता. या अर्जावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘सहानभूतीपूर्वक विचार करावा असा शेरा मारून हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश सांळुखे यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी शिक्षणाधिकारी राकेश सांळुके यांची भेट घेवून त्यांच्या बदली अर्जावर कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करीत होते. मात्र, शिक्षणाधिकारी सांळुखे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचा बदली अर्ज शिफारशीसह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय पाटील यांनी तक्रारदार यांच्या बदली अर्जावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महाले, कार्यालयीन अधीक्षक पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी ६६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार !
तक्रारदार यांना संबंधितांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली या तक्रारीच्या अनुषंगाने प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली तेंव्हा शिक्षणाधिकारी राकेश सांळुखे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच देण्यास सांगितले. तसेच वरिष्ठ सहायक विजय पाटील यांना भेटण्यास सांगितले. विजय पाटील यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी महाले, कार्यालयीन अधिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांना ६६ हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. तडजोडीअंती ५१ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल (दि. २६) जिल्हा परिषदेत सापळा रचला तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता ३५ हजार रुपये स्विकारतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश सांळुखे व वरिष्ठ सहायक विजय पाटील या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, उपशिक्षकाची बदली नॉन पेसा क्षेत्रात करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
यांनी यशस्वी केला सापळा !
याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्यासह पथकातील कर्मचारी राजन कदम, मुकेश आहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
दोघांच्या घराची झाडाझडती !
शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्या औरंगाबाद येथील घरात औरंगाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक घरझडती घेत आहे. हे झडतीसत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर धुळ्यातील साक्री रोडवरील विकास कॉलनीत राहणारे वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांच्या घरात धुळे येथील पथक घरझडती घेत आहे. या दोघांच्या घरात काही आक्षेपार्ह आढळून आले का? याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.