भंडारा (वृत्तसंस्था) रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या गोठ्याच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी साडेआठ हजारांची लाच घेताना दोन अभियंत्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीत शनिवारी रात्री केली.
हर्षपाल राऊत (२६) आणि राधेश्याम गाढवे (५६) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केलेल्या अभियंत्यांची नावे आहेत. तक्रारदार हे मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी असून त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरांच्या गोठ्याचे बांधकाम करण्यासाठी ८९ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे तक्रारदाराने गोठ्याचे बांधकाम केले. त्यानंतर त्याचे बिल पंचायत समितीला सादर करून मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी तक्रारदाराने अभियंता राऊत यांच्याशी संपर्क साधला.
या वेळी अभियंता राऊत यांनी बिल काढण्यासाठी तक्रारदाराकडे ९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मोहाडी पंचायत समिती परिसरात सापळा रचला. यावेळी अभियंता राधेश्याम गाढवे यांनी तक्रारदार यांना अभियंता राऊत यांनी मागितलेली रक्कम देऊन बिल काढून घ्यावे, असे सांगितले.
तडजोडीअंती सडेआठ हजार रुपये स्वीकारताना दोन्ही अभियंते एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात अडकले. त्या दोघांना एसीबीच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी मोहाडी पेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलिस निरीक्षक अमित डहारे, सहायक फौजदार संजय कुरंजेकर, पोलिस हवालदार मिथुन चदिवार, अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, विवेक रणदिवे, चेतन पोर्ट, विष्णू वरठी, कुणाल कडव राजकुमार लेंडे, अभिलाषा गजभिये, थोटे आदींनी केली.