चोपडा (प्रतिनिधी) अवैधरीत्या वाळूची वाहतूक करू देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना विटनेर, ता.चोपडा येथील तलाठ्याला जळगाव एसीबीने मंगळवारी अटक केली. या कारवाईने महसूल प्रशासनातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. रवींद्र काशीनाथ पाटील (50, तलाठी सजा विटनेर, ता.चोपडा) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
विटनेर येथील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या सासर्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल मंजूर झाले आहे. घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने तलाठी पाटील यांनी वाळूच्या ट्रॅक्टरची वाहतूक करू देण्यासाठी दहा हजारांची लाच 28 मे रोजी मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणीत तलाठ्याने पाच हजारांची लाच मागणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी पाच हजारांची लाच स्वीकारताच तलाठ्याला अटक करण्यात आली. संशयीताविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर तसेच पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, हवालदार सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.