पुणे (वृत्तसंस्था) ९ लाखाच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह तिघांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काल स्थायी समितीची बैठक पार पडली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या कार्यालयात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने १० लाखांची लाच मागितली गेली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक, लिपिक, संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांचा समावेश आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात राजकीय षड्यंत्र आहे. लवकरात लवकर दूध का दूध, पानी का पानी होईल, असं भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी म्हटलंय. नितीन लांडगे यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महापालिका निवडणूक जवळ आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल या भीतीने हा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही आमदार लांडगे यांनी केलाय.