पारोळा (प्रतिनिधी) सख्या मेव्हण्याने शालकाच्या नावे असलेली विमा पॉलिसी व दिलेल्या स्कुटीचा अपघातात विम्याचा लाभ मिळवण्यासाठी फागणे येथील शालकास पारोळा हद्दीत ठार मारून त्याचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना देऊन बनवाबनवी केली होती. याप्रकरणी मेव्हण्यासह त्याच्या एका साथीदारास पोलिसांनी सखोल माहितीच्या आधारे २७ रोजी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पारोळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रारंभी १७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मयत समाधान शिवाजी पाटील (वय २६) याचा पारोळा हद्दीत अपघात झाल्याची नोंद धुळे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ही नोंद झिरो नंबरने पारोळा पोलीस ठाण्यात आल्यानंतर १९ रोजी अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली. त्यानंतर त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांच्याकडे देण्यात आला. या वेळी पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, हवलदार सुनील हटकर, किशोर भोई यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यात घटनेचे ठिकाण व घटनेचे स्वरूप हे संशयास्पद दिसून आले. यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व घटनेचे गांभीर्य पाहता घटनेचा सखोल तपास करण्याचे चौकशी अधिकारी पो.उ.नि. अमरसिंह वसावे, हवालदार सुनील हटकर, हवालदार संजय पाटील, हवालदार अनिल राठोड, हवालदार अभिजीत पाटील यांच्या पथकाला आदेश देण्यात आले. या पथकाने संशयित व इतर संबंधित व्यक्तींचे सर्व कंपनीचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचे सीडीआर काढले. तर संदीप पाटील याने दिलेली खबर व प्रत्यक्षदर्शी पुरावे यात तफावत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तपास पथकाने घटना घडल्यापासून पारोळा शहर, अमळनेर शहर, धुळे अशा ठिकाणी तपास पथक रवाना करून सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती मिळवली.
अन् अपघाताचा बनाव उघड
यातील संशयित आरोपी संदीप भालचंद्र पाटील याने त्याचा शालक मयत समाधान शिवाजी पाटील याच्या नावावर वेगवेगळ्या विमा कंपनीच्या पॉलिसीस काढून ठेवलेल्या होत्या. त्यांना मयताची आई व आरोपीची पत्नी यांना वारस केल्याचे दिसून आले. दरम्यान, या अपघातात दाखवलेली स्कुटी (एमएच- ५४, ए- ९५१३) चा ही पूर्ण इन्शुरन्स होता. त्यातून आरोपी संदीप भालचंद्र पाटील (रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा) व त्याचा साथीदार चंद्रदीप आधार पाटील (रा. खवशी, ता. अमळनेर) यांनी कट रचून मयत समाधान पाटील यांच्या नावावरील विमापॉलिसी रक्कम व दुचाकीच्या विम्याची रक्कम पूर्णपणे आपणास मिळावी, या हव्यासातून त्याचा खून करून अपघाताचा बनाव केला.
आरोपींना घेतले ताब्यात
याबाबत पारोळा पोलिसांत शेवगे येथील आरोपी संदीप भालचंद्र पाटील (वय ४०) व खवशी येथील चंद्रदीप आधार पाटील (वय ४५) यांच्याविरुद्ध पारोळा पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम १०३, ६१(२) अन्वये १८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते करत आहेत.