पारोळा (प्रतिनिधी) जळगाव येथे जाण्यासाठी निघालेल्या शिंपी दांपत्याची बस स्थानकातून बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी पिशवी कापून सुमारे ७ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. २९ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुलीचे दागिने व रोख रक्कम परत देण्यासाठी जात असताना ही घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की, पारोळा येथील नगरपालिकेचे सेवानिवृत्त ग्रंथपाल भटू सोनू शिंपी (रा. गाव होळी चौक. पारोळा) यांच्याकडे गेल्या काही दिवसापासून त्यांची जळगाव येथील मुलगी व जावयाने ८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचा तुकडा तसेच ३ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम ठेवायला दिली होती. ही रक्कम त्यांनी आपल्या पारोळा येथील जेडीसीसी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली होती. परंतु मुलीला या रकमेची गरज असल्याने ती त्यांनी मागितली होती. त्याप्रमाणे लॉकरमधून हा ऐवज काढून २९ रोजी भटू शिंपी आपल्या पत्नीसह रक्कम परत देण्यासाठी जळगाव येथे जाण्यासाठी निघाले. पारोळा बस स्थानकात ४ वाजेच्या सुमारास मालेगाव ते मुक्ताईनगर गाडीमध्ये चढताना अज्ञात चोट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या जीन्सच्या कापडी पिशवीला ब्लेड मारून पिशवीतील दागिने, पैसे व रोख रकमेचा बॉक्स लंपास केल्याची घटना घडली. यात एकूण सुमारे ७ लाख ७ हजार रुपयांचा मौल्यवान वस्तू व रोख रुपये होते. याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.