धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात विना हेल्मेट अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कारवाई करण्यापूर्वी धरणगावचे पोलीस निरीक्षकांनी सोमवारी गांधीगिरीचा अनोखा उपक्रम राबवला.
विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाई न करता, पोलीस निरीक्षकांनी त्यांना गुलाबाचे फुल देऊन यापुढे हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. वाहनचालकांनीही या अनोख्या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
या उपक्रमात हवलदार नागराज साळुंखे, समाधान भागवत, वर्षा गायकवाड, जितेंद्र बदाने, उमेश पाटील, संजना पावरा, चंदन पाटील आणि सुमित बाविस्कर आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या गांधीगिरीमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून हेल्मेट वापरण्याच्या सवयीबाबत सकारात्मक संदेश पोहोचवला गेला आहे.