जळगाव (प्रतिनिधी) मध्य प्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन रावेर येथे आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने ताब्यात घेऊन तिच्याकडून ५०० ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत करण्यात आली. महिलेस ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला देखील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने काल रावेर येथे मोठी कारवाई केली होती. याच्या अंतर्गत रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (वय ४५ रा. मोमीनपुरा बडा कमेलापास ता.जि. बऱ्हाणपुर) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन कीट जप्त करण्यात आले होते. या महिलेची चौकशी केली असता तिने हा माल मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर याचा असल्याचे सांगितले होते.
या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीचे एक पथक तातडीने मध्यप्रदेशात रवाना झाले. या पथकाने रात्री उशीरा सलीम खान शेर बहादूर याला अटक केली आहे. यामुळे आता ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आला असून परिणामी यातील रॅकेट उघड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे आले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकाऱ्याने केली.