नाशिक (वृत्तसंस्था) आडगाव शिवारात राहणाऱ्या पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा मारून तिचा खून केला. त्यानंतर पतीने घरातच आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.१३) उघडकीस आली. धनश्री विशाल घोरपडे (वय २६) असे पत्नीचे, तर विशाल निवृत्ती घोरपडे (वय २९, रा.तुळजा भवानी निवास, इच्छामणी नगर, आडगाव शिवार) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
घोरपडे दाम्पत्यास अडीच वर्षांचा मुलगा असून, विशालची आई या दोघांसोबत राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून पतीपत्नीमध्ये सतत वाद होत होते. विशाल धनश्री हिच्याशी चारित्र्याच्या संशयावरून भांडण करीत होता. चार-पाच दिवसांपासून हे भांडण अधिकच वाढले होते. मंगळवारी (दि. १२) रात्री ११- ११. ३० च्या दरम्यान या दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. यावेळी विशालची आई नातवाला घेऊन घराजवळील महादेव मंदिरात जाऊन झोपली.
बुधवारी (दि.१३) सकाळी घरी आल्यानंतर त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे, तर सून धनश्री रक्ताच्या थारोळ्यात किचनमध्ये पडल्याचे दिसून आले. भयभीत झालेल्या विशालच्या आईने आडगाव पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास विशाल व धनश्री यांच्यात झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात विशालने किचनमध्ये असलेला दगडी वरवंटा उचलून धनश्रीच्या डोक्यात घातला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून भानावर आलेल्या विशालने त्यानंतर आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनेचे कारण समजू शकले नसले तरी चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी धनश्रीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.