जालना (वृत्तसंस्था) शेतामधील सामायिक विहिरीचे पाणी तिसऱ्याला का दिले? या कारणावरुन झालेल्या वादातून तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची सोमवारी रात्री उशिरा मौजपुरी येथे घडली. योगेश बाबासाहेब डोंगरे (वय २५), असे मयत तरुणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे हा खून मयत तरुणाच्या चुलत भावानेच केल्याचं उघड झालं आहे.
योगेश आणि त्याच्या चुलत भावाचा शेतातील विहिरीच्या पाणी वाटपावरुन वाद सुरु होता. त्यावरुन शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे व इतरांचा सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वाद झाला. हे प्रकरण गावकऱ्यांनी मध्यस्थी करुन मिटविले. परंतु, रात्री ११ वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून पंडित आसाराम डोंगरे हा गावात आला आणि पुन्हा वाद सुरु झाला. यावेळी योगेश बाबासाहेब डोंगरे, प्रल्हाद चांगुजी डोंगरे, गणेश डोंगरे, शिल्पा योगेश डोंगरे आणि शोभा डोंगरे यांना पंडित आसाराम डोंगरे आणि शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे व साथीदारांनी लोखंडी रॉड आणि लाकडाने मारहाण करायला सुरुवात केली.
या मारहाणीत योगेश डोंगरे याच्या डोक्यात जाड लाकूड फेकून मारले. त्यामुळे डोक्याला मार लागून योगेश गंभीर जखमी झाला. योगेशच्या डोक्यात आणि डोळ्यावर खोलवर जखम झाल्याने तो खाली कोसळला. योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांना गावातील काही नागरिकांनी त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथून त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात पंडित डोंगरे, शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे, पवन टोम्पे, आसाराम डोंगरे आणि दोन महिलासह एक विधीसंघर्ष बालक या ७ जणांविरुद्ध खुनासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. तर पुढील तपास सहायक निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.