बुलढाणा (वृत्तसंस्था) चुलत बहिणीच्या लग्नासाठी रजेवर आपल्या गावी येसापूर येथे आलेल्या सीमा सुरक्षा दलाचा जवानचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ मे रोजी रात्री नागपूर – संभाजीनगर महामार्गावरील भानापूर गावा जवळ घडली. विकास शालीकराम गायकवाड (वय ३०), असे मयत जवानचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, सीमा सुरक्षा दलाचा जवान विकास गायकवाड हे हे आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी रजेवर आपल्या गावी येसापूर येथे आले होते. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते नागपूर संभाजीनगर महामार्गावरून अंजनी खुर्दकडून मित्र किशोर शंकर धांडे (वय ३४) यांच्यासह आपल्याने दुचाकीने घराकडे परत येत होते. परंतू भानापूर गावाजवळ येताच त्यांच्या दुचाकीला समोरुन भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात जवान विकास गायकवाड यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार तर त्यांचा मित्र किशोर धांडे हे गंभीर जखमी झालेत. अपघात झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी धांडे यांना मेहकर येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. जवान विकास गायकवाड यांच्या पार्थिवावर १८ मे रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चार वर्षीय चिमुरड्याने वडिलांच्या तिरडीस हात लावताच उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तर कुटुंबियांच्या आक्रोश मन हेलावून सोडणारा होता.