मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.
डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. आता तुम्हाला भेटायला आलो म्हणून बोलायचं म्हणून काहीही बोलणार नाही. मी थोडा अवधी घेऊन बोलेल. पण जे काही ऐकायला आलंय त्यावरून बजेट देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. अर्थसंकल्पाची सर्व माहिती घेऊन त्याचा सारांश समजून घेऊन मी त्यावर भाष्य करेल, असंही ते म्हणाले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. तसेच काही राज्यात निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी अधिकच जास्त गिफ्ट देण्यात आलं आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.