छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) डेटिंग अॅप ‘टिंडर’ वरून मैत्री करून दोघांमधील खासगी क्षणांचे रेकॉर्डिंग करून बिल्डरला ब्लॅकमेलिंग करत लाखों रुपये उकळणाऱ्या उच्च शिक्षित तरुणीला पोलिसांनी सापळा रचून ११ लाखांची खंडणी स्वीकारतांना गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. स्वाती विष्णूकांत केंद्रे (रा. दर्गा रोड, प्लॉट क्र ३, सातारा) आणि ताहेर पठाण असे संशयित आरोपींचे नाव आहेत.
नेमकं काय घडलं !
एक नामांकित बिल्डर मे २०२३ मध्ये सोशल मीडियावरील टिंडर अॅपच्या माध्यमातून स्वाती केंद्रे या तरुणीच्या संपर्कात आला. अॅपवरून चॅटिंग केल्यानंतर दोन दिवसांतच तिने भेटण्याचा प्रस्ताव ठेवला. बिल्डरही लगेच तिला भेटायला गेला. एकमेकांचा परिचय झाला. तेव्हा स्वातीने तिचे नाव सायली, असे सांगितले होते. तसेच, लग्न झालेले असून पती कामानिमित्त बाहेर असतो. त्यामुळे चांगला मित्र हवा, असे सांगून तिने थेट लाँग लाईफ मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा बिल्डरनेही संसारिक असल्याचे सांगून पत्नी, मुले असल्याचे स्पष्ट करत ‘मैत्री’ चा प्रस्ताव नाकारला. तेव्हा तिने निखळ मैत्रीचा हात पुढे केला. पण तिने पुढे ओळख वाढवत नेली. ओळखीचे चांगल्या मैत्रीत रुपांतर झाल्यावर ते अनेकदा भेटले. तेव्हा आरोपींनी त्या काही खास क्षणांचे फोटो काढून ठेवले. बिल्डर आणि स्वातीची मैत्री हळूहळू पुढच्या टप्यावर गेली. तेव्हा तिने कौटुबिक कारणे सांगून बिल्डरकडून कधी १० तर कधी २० हजार असे जवळपास ४० ते ५० हजार रुपये उकळले. हे पैसे तिने परत केले नाही.
पोलिसांनी रचला सापळा !
नोव्हेंबर २०२३ च्या आधी स्वातीने बिल्डरला फोन केला. आपल्या मैत्रीबाबत पती संतोष मुंढे याला माहिती झाल्याचा बनाव केला. तसेच, त्याने वाद घातला असून त्याने मला व्यवसायासाठी ५ लाख रुपये दिले होते, ते परत मागत असल्याचे सांगून तत्काळ ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच, पैसे दिले नाही तर तुझ्या घरी येऊन सर्वांना याबाबत सांगावे लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर ७ नोव्हेंबरला ती तिच्या स्कूटीवरून कलाग्रामजवळ आली. एक काळ्या रंगाची चारचाकी काही अंतरावर उभी करून त्यात पती संतोष मुंढे असल्याचे सांगितले. त्याच्याशी बिल्डरचे बोलणे करून दिले. त्यानेही पैशांची मागणी केली. तेव्हा तीन लाख रुपये रोख, ७५ हजार फोन पे वर आणि २५ हजार रुपये बँक खात्यावर पाठविले होते. ८ नोव्हेंबरला चार लाख रुपये दिल्यानंतर १५ नोव्हेंबरला स्वाती केंद्रे हिने टाऊन सेंटर येथील बिल्डरचे कार्यालय गाठले. त्याला व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगून व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्यासाठी दबाव टाकला.तेव्हा हो नाही करीत तिने त्याला ११ लाखांची खंडणी मागितली.
बिल्डरची पोलिसांत धाव !
आपल्याला होणारी ब्लॅकमेलिंग कुठे तरी थांबली पाहिजे, असा विचार करून बिल्डरने एमआयडीसी सिडको ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांना सर्व हकिकत सांगितली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे, अंमलदार कोमल तारे, गायकवाड यांना कारवाईसाठी सोबत घेतले. ५०० च्या ४८ नोटा खाली वर लावून मध्ये मनोरंजनाच्या नोटा घातल्या आणि १२ बंडल तयार केले. मॉस्को कॉर्नर येथे सापळा लावला. स्वाती केंद्रे ही तेथे आल्याची खात्री पटताच तिला पोलिसांनी पैसे घेताना रंगेहात पकडले. तिच्यावर एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवणे करीत आहेत.