चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघळी येथील एका घरातून अडीच लाख रुपये रोख रक्कम, सोन्या व चांदीचे दागिने, असा एकूण साडे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान भर वस्तीत चोरीची घटना घडल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वाघळी या गावात भागवत महादू खैरे हे वास्तव्यास असून शेतकरी तथा दुग्ध व्यवसायिक आहेत. दिनांक 8 मार्च रोजी भागवत खैरे यांचा मुलगा शेतात गेला होता तर लहान मुलगा पत्नीसह वरच्या मजल्यावर झोपायला गेले होते. आणि भागवत हे खालच्या घराला कुलूप लावून त्यांच्या दुसऱ्या घरी झोपायला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेली दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम, दोन सोन्याच्या बांगड्या, चार सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याची मंगळपोत, असा एकूण ५ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार हे करीत आहेत.