
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील तुकाराम नगर परिसरात बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २३ हजार ९१५ रुपयांचा ऐवज लंपास केला. १७ ऑक्टोबरला सायंकाळी ही घरफोडी उघडकीस आली असून या प्रकरणी १८ ऑक्टोबरला बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तुकाराम नगरातील दत्त म्हाळसाई इमारतीत लीलाधर पंडित बोरोले (वय ५९) हे कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी ऋतुजा पुणे येथे शिक्षण घेत असून, पत्नी सुनीता या दीपनगर येथे नोकरीला आहेत. १७ ऑक्टोबरला पहाटे साडेपाचच्या सुमारास लीलाधर बोरोले हे डोळ्यांच्या उपचारासाठी जालना येथे गेले होते. सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून कामावर गेल्या. त्यामुळे दिवसभर घर बंद होते. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जालन्याहून घरी परतलेल्या बोरोले यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. दरवाजाची कडी-कोयंडा तोडल्याचे लक्षात येताच त्यांनी घरात पाहणी केली. त्यावेळी दोन्ही शयनकक्षांतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले, तर कपाट फोडलेले होते. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी १ लाख १४ हजार ४९२ रुपयांची साडेचार तोळ्यांची सोन्याची पोत, २८ हजार ६२३ रुपयांच्या पाच ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ५ हजार ६०० रुपयांच्या दोन ग्रॅमच्या लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, २५ हजार २०० रुपयांची नऊ ग्रॅमची सोन्याची कर्णफुले आणि अडीच लाखांची रोकड असा एकूण ४ लाख २३ हजार ९१५ रुपयांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे, पुण्यात शिकणाऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी घरात ठेवलेली अडीच लाखांची रोकडही चोरट्यांनी चोरून नेली. तर, शहरातील बंद घरांना लक्ष्य करून होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
फॉरेन्सिक अन् श्वान पथकाकडून तपास
घटनेची माहिती मिळताच बोरोले यांनी इमारतीतील अशोक बोरोले आणि मोहन बोरोले यांना याबाबत कळवले. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करून पाहणी केली. पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र पगारे तपास करत आहेत.
















