पारोळा (प्रतिनिधी) गणपती नगर/ श्रीनाथजी नगर येथील घरातून रोख रक्कमेसह चांदीच्या मुर्त्या चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महादू बारकू पाटील (वय ५७ रा. गणपती नगर/ श्रीनाथजी नगर पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २७ मे २०२२ रोजी रात्री ९ वाजता ते दि. २८ मे २०२२ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान प्लॉट नं. ७ गणपतीनगर/श्रीनाथजी नगर पारोळा येथील घरातुन ३५ हजार रुपये रोख रक्कम, ४ हजार रुपये किंमतीचे देव्हाऱ्यातील चांदीचे देव खंडेराव, कानबाई, गणपती वजन, ५५ हजार रुपये रोख रक्कम, दोन डायऱ्या व एन. ए. जमिनीचे कागदपत्रे, ६ हजार रुपये किमतीची लक्ष्मीच्या तिन चांदीच्या मुर्त्या असा एकूण ५० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून घरातील सामानाचे नुकसान केले आहे. तसेच वर्धमान नगर येथील हेमंत सोमनाथ पाटील हे सुध्दा बाहेर गावी असतांना त्यांच्या घराचे कडीकोंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांच्या घरातून काही एक चोरी झालेले नाही. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. बापुराव पाटील हे करीत आहेत.