जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) दोडा जिल्ह्यात बुधवारी प्रवासी बस ३०० फूट दरीत कोसळल्याने ३८ जण ठार आणि २० जण जखमी झाले. बटोटे-किश्तवार राष्ट्रीय महामार्गावरील त्रुंगल असरजवळ हा अपघात झाला. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
या बसमध्ये एकूण ५८ जण प्रवास करत होते. ही बस किश्तवार येथून जम्मूला जात असताना सकाळी ११.५० वाजता या बसला हा भीषण अपघात झाला. अपघात भीषण असल्याने जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात जखमींना जम्मूतील सरकारी महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने बस रस्त्याच्या योग्य बाजूने तसेच योग्य रितीने न चालवल्याने ही बस शेजारच्या संरक्षक धक्क्याला आदळली आणि त्याच्यावरून ती दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागचे खासदार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आवश्यकतेनुसार अपघातग्रस्तांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. बस रस्त्यावरून घसरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून खूप उंचीवरून खाली पडल्याने बसचे मोठे नुकसान झाले. स्थानिक लोकांबरोबरच पोलीस आणि राज्य आपत्ती निवारण दलातील कर्मचाऱ्यांचे वेगाने बचाव कार्य केले.