नागपूर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मानवविकास कार्यक्रमांतर्गत शाळेत ये–जा करण्यासाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत केली.
यावेळी आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर या सात तालुक्यांचा मानवविकास निर्देशांक कमी आहे. या पार्श्वभूमीवर मानवविकास कार्यक्रमांतर्गत या तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीसाठी बसेस पुरविण्यात आल्या आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या सात तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी किमान १०० बसेसची आवश्यकता असताना आतापर्यंत केवळ ४९ बसेसच उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे वास्तव लक्षात घेता जळगाव जिल्ह्याचा मानवविकास निर्देशांक उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित व सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मानवविकास कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त बसेस पुरविण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आ. खडसे यांनी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शासन निर्णय दिनांक १९ जुलै २०११ व २७ मार्च २०१४ अन्वये मानवविकास कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर या सात तालुक्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेस पुरविण्यात आल्या आहेत.
सध्या अतिरिक्त बसेसची कोणतीही अधिकृत मागणी प्राप्त झालेली नाही. मात्र, भविष्यात अतिरिक्त बसेसची मागणी करणारा प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यावर नियमानुसार निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
















