मुंबई (वृत्तसंस्था) “महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सामना संपादकीयमधून लगावला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या अग्रलेखातून नाना पटोले यांना पुन्हा एकदा चिमटा काढण्यात आला. सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा ‘सामना’ने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही सामना वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
“काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे. प. बंगालात पक्षाला खातेही उघडता आले नाही, यावर खंत व्यक्त केली गेली. आता सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त करणे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सवाल विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.
“प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन. रंगास्वामी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, पण हे तिघेही माजी काँग्रेसवाले आहेत. त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर जावे लागले, पण जेथे गेले तेथे त्यांनी स्वतःचे अस्तित्व अधिक तेजोमय केले. ममता बॅनर्जी यांनी मोदी-शहांच्या बलाढय़ सत्तेशी लढा देऊन विजय प्राप्त केला. त्यांचा मूळ पिंड काँग्रेसचाच आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा त्याग करताच प. बंगालातील काँग्रेसचा डोलाराच कोसळला. काँग्रेस म्हणजे कधीकाळी स्वातंत्र्य आणि संघर्ष होता. आज राहुल गांधींचा लढा एकाकी आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात. त्यांच्यावर प्रचंड टीका घाणेरडय़ा शब्दांत होत असताना ते त्यांच्या मुद्दय़ाला धरून लढत राहतात. कोरोना काळात राहुल गांधी यांनी घेतलेल्या अनेक मुद्दय़ांवर सरकार पक्षाकडून टीकेची झोड उठली, पण लसीकरणापासून पुढे इतर अनेक विषयांत सरकारने राहुल गांधींचीच भूमिका स्वीकारली. राहुल गांधी हेच आजही काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. जगभरातून हिंदुस्थानला जी परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा त्या फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले व त्यावर राष्ट्रीय मंथन झाले,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.
नाना पटोले काय बोलले होते
“संजय राऊत काय बोलतात याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. जे काही आम्हाला त्यांना सांगायचं होतं ते अगोदरच सांगितलेलं आहे. त्यांचा सामना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलं आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर बरं, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असं कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं.” असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.