कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) येथील बाजारपेठेत ३० रुपयांचे स्क्रॅच कुपन आणि नंतर फक्त दोन हजार रुपयांत लागेल. टीव्ही, फ्रिजचे आमिष दाखवत अनेकांना एका भामट्याने लुटल्याची घटना घडली आहे. रक्कम उकळली गेल्यावर हा ठग कजगावमधून पसार झाला.
तीस रुपयांच्या स्क्रॅच कुपनवर हमखास बक्षीस जिंकण्याची ऑफर
येथील सराफ बाजार, स्टेशन रोड, नागद रोड, बसस्थानक चौक या भागात एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेला तरुण बाजारपेठेत दाखल झाला. त्याने कुपनची ऑफर दिली. तीस रुपयांच्या स्क्रॅच कुपनवर हमखास बक्षीस जिंका, अशी ऑफर होती. आधी तीस रुपयांचे कुपन घ्यायचे आणि नंतर स्क्रॅच केल्यावर त्यात पंखा, गॅस शेगडी टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर, कॅमेरा, घड्याळ, फ्रीज, शिलाई मशीनसह विविध बक्षिसे तुम्हांला हमखास लागेल.काही जण त्याच्या आमिषाला बळी पडले.
वस्तू देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी
कुपनमध्ये लागलेल्या वस्तू देण्यासाठी त्याने दोन हजार रुपयांची मागणी केली. काहींनी आधी वस्तू आण मग पैसे घे, असे सांगत त्याला बाहेर केले. तर काहींनी त्याच्या आमिषाला बळी पडत त्याला पैसेही दिले. ज्या दिवशी हा महाठग आला. त्या दिवशीच रक्कम गोळा करत दुपारी चार वाजता तो पसारदेखील झाला. ज्यांनी त्याला पैसे दिले होते. ते वाटच बघत राहिले.
आसपासच्या गावांमध्येही फसवणूक
स्पेशल ऑफर घेऊन कजगावच्या बाजारपेठेत दाखल झालेल्या या महाठगाने संभाषण कौशल्याने ग्राहकांना भुरळ पाडली. त्याने गाडी सायंकाळपर्यंत पोहोचवल्यावर पूर्ण ऑर्डर देतो, असे आश्वासनदेखील दिले होते. त्याच्या याच संभाषणाला ग्राहक भुलले. असेच प्रकार आसपासच्या गावांमध्येदेखील झाल्याचे कळते.
















