बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील येवती येथील तब्बल १४ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या लाखो रुपये किमतीच्या केबल चोरीला गेल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
येवती येथील विनोद दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली की ते गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्या कूपनलिकेतील केबल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी स्वतःच्या शेतामधील इतर कूपनलिकांच्या केबलचा शोध घेतला असता त्या सुद्धा चोरीला गेल्याचे दिसले. नंतर त्यांनी इतर शेतकऱ्यांची माहिती घेतली. त्यात परिसरातील १३ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची केबलची चोरी गेल्याचे समोर आले. या आधी तीन महिन्यांपूर्वी शिंदे यांच्या शेतातून केबल चोरी झाली होती. आता ऐन हंगामात पिकांना पाणी देणे गरजेचे असल्याच्या काळात केबल चोरीलागेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
खरीप हंगामातील शेती उत्पन्न तोट्यात असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामात उत्पन्न येईल अशी आशा आहे. मात्र पिकांना पाणी देण्याची गरज असतांना केबल चोरीला गेल्याने हजारो रुपयांची नवीन केबल घेऊन ती परत मोटारींना जोडणे यात खर्चतर आहेच, पण आधीच लोडशेडिंगमुळे कमी पाणी मिळत असलेल्या पिकांना आणखी पाच सहा दिवस पाणी नसल्याने पिकांवर सुद्धा दुष्परिणाम होतील. शेतात केबल चोरी झालेल्या शेतकऱ्यांची नावे अशी विनोद दत्तात्रय शिंदे, राजेंद्र समाधान शिंदे, दत्तू लक्ष्मण धनगर, शिवाजी रामा वाघ, भागवत जगन्नाथ ठाकूर, दगडू रामचंद्र माळी, उमेश रतन वाघ, नीलेश तुळशीराम वानखेडे, अनिल संपत वानखेडे, मनोहर दत्तू पाटील. या प्रकरणी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.
















