जळगाव (प्रतिनिधी) येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये १७ डिसेंबर १९ रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पाच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल झाले असून पाच आरोपींपैकी चार आरोपींची जामीनवर सुटका झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
यातील प्रमुख आरोपी सुमित उर्फ मोन्या सुधाकर बनसोडे राहणार समता नगर जळगाव यांनी त्याच पीडितेला दिनांक २३ फेब्रुवारी रोजी अपहरण करून घेऊन गेला म्हणून पीडितेच्या आईने रामानंदनगर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली असता मिसिंग कंप्लेंट नोंदवून घेण्यात आली व २६ फेब्रुवारीला त्या पीडितेला व आरोपीला पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. पीडितेची आई, वडील, भाऊ, तिला घ्यायला गेले असता त्या पीडितेने त्यांच्या सोबत येण्यास नकार दिला व मी याच आरोपी सोबत राहील असे सांगितले.
पिडिते वर एका वर्षात दबाव
पीडिता व आरोपी हे एकाच गल्लीत राहत असल्याने व न्यायालयात केस बोर्ड वर येत असल्याने आरोपीने पीडितेच्या आई व पीडितेला १८ फेब्रुवारी रोजी धमकी दिली होती की, केस परत न घेतल्यास तुम्ही तुमचे बघून घ्या व २३ फेब्रुवारी रोजी पळवून नेले, तीन दिवस सोबत ठेऊन परत आणले असता पीडितेने आपल्या आईस सांगितले की, आपण जी केस केली आहे. ती परत घ्या नाहीतर मी आरोपी सोबतच जाईल. पीडिता आता १८ वर्षाची झाल्याने तिने हा निर्णय घेतला परंतु तो निर्णय भीती पोटी घेतला असावा ही शक्यता आहे. पाच आरोपींविरुद्ध याच पीडितेने न्यायालयास समक्ष १६४ चा कबुलीजबाब देऊन तिच्या सोबत झालेल्या अन्यायाची आपबिती नमूद केली आहे. म्हणून पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात तीस आशादीप वसतिगृहात ठेवले आहेत.
अनैतिक वृत्तीने दोन समाजामध्ये तेढ होण्याची शक्यता
याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे व रोशनी फाऊंडेशनचे अन्वर खान यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यात सदर आरोपीवर त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी तसेच सदर आरोपी हा पीडिता, तिचे नातेवाईक व साक्षीदारांवर दबाव आणीत असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा सत्र न्यायाधीश व सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.