जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दगडी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक इमारतीच्या विक्रीच्या प्रस्तावाला आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. त्यांनी या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करून विक्रीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
आमदार खडसे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दगडी बँकेची इमारत ही बँकेची स्वतःची मालमत्ता असून तिची बाजारभावानुसार किंमत किमान ६५ कोटी रुपये आहे. या इमारतीवर कुणाचेही कर्ज नसताना विक्रीचा निर्णय घेणे हे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. “पूर्वजांनी उभारलेली ऐतिहासिक वास्तू विक्रीस काढण्याचा अधिकार संचालक मंडळाला कोणी दिला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच, बँकेत होणाऱ्या २२० कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतही आमदार खडसे यांनी भूमिका मांडली. राज्य सरकारने दिलेली भरतीची परवानगी स्वागतार्ह असली तरी ही प्रक्रिया शंभर टक्के पारदर्शकपणे व्हावी, यावर त्यांनी भर दिला. “मागील वेळी IBPSमार्फत भरती झाली तेव्हा एकाही उमेदवाराने तक्रार केली नव्हती. यावेळीही भरती केवळ मेरिटनुसार झाली पाहिजे. वशिलेबाजी किंवा शिफारस खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
खडसे यांनी पुढे सांगितले की, बँकेत भरतीच्या नावाखाली काही जण २०,००० रुपये मागत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या असून अशा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी.
दगडी बँक ही केवळ एक इमारत नसून जिल्हा बँकेची ओळख आणि वारसा असल्याचे नमूद करताना खडसे म्हणाले की, “या वास्तूतून पहिल्या चेअरमनपासून ते सर्व पदाधिकारी कार्यरत राहिले आहेत. लाखो शेतकरी आणि खातेदारांच्या भावना या वास्तूशी जोडलेल्या आहेत. बँकेला सध्या मालमत्ता विक्रीची कोणतीही आर्थिक निकड नाही. त्याऐवजी बेकायदेशीर केळी लागवडीस दिलेली थकीत कर्जे वसूल करण्यावर लक्ष द्यावे.”
शेवटी त्यांनी इशारा दिला की, विक्रीचा निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन “दगडी बँक बचाव मोहीम” तीव्र करण्यास भाग पाडले जाईल.
 
	    	
 
















